स्त्रीला दुय्यम ठरवणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध पोलादी विचारांची गरज

कुटुंब, समाज, जात आणि धर्म —या प्रत्येक पातळीवर स्त्रियांना सतत एकच वाक्य ऐकायला मिळालं आहे:“तुला हे जमणार नाही.”“तू गप्प बस.”“हे तुझ्यासाठी नाही.”
ही वाक्यं केवळ शब्द नाहीत, तर पिढ्यान्-पिढ्या स्त्रियांना दुय्यम ठरवणारी मानसिकता आहे. अशा वातावरणात संविधान हा केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून तो आपल्या विचारांचा, आपल्या डी.एन.ए.चा भाग झाला पाहिजे, असे मत मी एका संवादाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसमोर मांडले.
महिला दिन : संवाद, संघर्ष आणि जाणीव
सनराईज बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि दयानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.
या संवादाचा केंद्रबिंदू एकच होता —स्त्री ही सहनशीलतेची मूर्ती नसून बदल घडवणारी शक्ती आहे.
कार्यक्रमाला विविध शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक वक्त्याच्या शब्दांतून एक बाब स्पष्ट होत होती —अशा संवादांची गरज आजच्या विद्यार्थिनींना नितांत आवश्यक आहे.
संविधान आणि स्त्रीचे स्वातंत्र्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या अधिकारांचा उपयोग करता येतो.मात्र अधिकार कागदावर असून उपयोग तेव्हाच होतो, जेव्हा स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास निर्माण होतो.
म्हणूनच संविधान हे केवळ अभ्यासक्रमात न राहताविचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि जगण्यात उतरले पाहिजे.
‘पोलादी बाया’ : वेदनांपेक्षा कणखरपणाचा प्रवास
“पोलादी बाया” ही संकल्पना वेदना मांडण्यासाठी नाही.ती आहे कणखरपणाचं प्रतीक.
मी विद्यार्थ्यांना सांगितलं —शाळेतील शेवटच्या बाकावर बसणारी मुलंबहुतेक वेळा गोंधळ करणारी किंवा दुर्लक्षित वाटतात.पण वास्तवात क्रांती बहुतेक वेळा तिथूनच सुरू होते.
भटक्या जमातीतील अनेक मुलं शिक्षणव्यवस्थेत शेवटच्या बाकावर असतात,पण सामाजिक परिवर्तनात त्यांचं योगदान महत्त्वाचं ठरतं.
स्त्रीची ओळख भावनिकतेपुरती मर्यादित न राहता‘पोलादी बाया’ म्हणून निर्माण होणं ही आजच्या काळाची गरज आहे.
नारी नेतृत्व आणि शक्यतेची व्याख्या
माझा प्रवास लाज शोधण्यासाठी नाही.तो आहे नारी नेतृत्वात अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्यासाठी.
नैसर्गिकरित्या बाळाला दूध पाजणाऱ्या स्त्रीकडे ज्ञान नाही, अशी समजूत आपल्याच समाजाने निर्माण केली.प्रत्यक्षात त्या प्रक्रियेतच जीवनाचं, काळजीचं आणि नेतृत्वाचं मूळ ज्ञान दडलं आहे.
संवादाची गरज, कार्यक्रमांची गरज
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात हे स्पष्टपणे मांडले गेले कीअशा व्याख्यानांमुळे विद्यार्थिनींमध्ये विचारांची दिशा मिळते.ही दिशा करिअरपुरती मर्यादित नसून स्वतःच्या अस्तित्वाविषयी जागरूक करणारी असते.



Comments